पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी….मोशी कचरा डेपो येथील प्रशासकीय इमारतीच्या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू होऊनही संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर अद्याप सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यावर गंभीर आरोप करत टीका केली. मोशीतील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प हा आमदार लांडगे यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असल्याचे सांगत, दुर्घटनेला दहा दिवस उलटूनही त्यांनी या घटनेवर एक शब्दही उच्चारलेला नाही, अशी टीका भापकर यांनी केली. “त्यांच्या मौनाचे रहस्य काय? दातही आपले आणि ओठही आपले अशी अवस्था निर्माण झाल्यामुळेच ते मौन बाळगून आहेत का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
आंदोलनादरम्यान मोशी कचरा डेपो दुर्घटनेस जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी, जखमींना २५ लाख रुपयांची मदत द्यावी तसेच मृतांच्या कुटुंबातील एका सदस्यास महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
मागण्या तातडीने मान्य न झाल्यास शहरवासीयांच्या सहकार्याने व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
या आंदोलनाचे नेतृत्व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहराध्यक्ष चेतन पवार आणि मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केले.
