मूलभूत नागरी सुविधांसाठी महापालिका आयुक्त कार्यालयावर भव्य मोर्चा; प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी….घरकुल परिसरातील गेल्या १२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत नागरी सुविधांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या मागणीसाठी गुरुवारी घरकुल परिसरातील नागरिकांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त कार्यालयावर भव्य जनआक्रोश मोर्चा काढला. महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच भाजी मंडई धारक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाल्याने परिसरातील नागरिकांच्या तीव्र असंतोषाचे चित्र पाहायला मिळाले.
मोर्चाचे नेतृत्व मारुती गणपत जाधव यांनी केले. यावेळी महापालिका प्रशासनाला सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. घरकुल परिसरातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या नागरी सुविधांच्या प्रश्नांवर तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
नागरिकांनी निवेदनाद्वारे एसटीपीचे दूषित पाणी घरकुल परिसरात येणे तातडीने बंद करावे, अनेक वर्षांपासून बंद असलेली भाजी मंडई सुरू करावी, अपूर्ण सांस्कृतिक भवन नागरिकांसाठी खुले करावे, व्यायामशाळा सुरू करावी, अंगणवाडी व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, मुख्य प्रवेशद्वारावर कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमावेत, स्टॉर्म वॉटर लाईनची नियमित स्वच्छता व दुरुस्ती करावी, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी तसेच घरकुल परिसरासाठी विशेष विकास कृती आराखडा जाहीर करावा, अशा प्रमुख मागण्या केल्या.
मोर्चात काँग्रेसचे नेते सोमनाथ शेळके, सुग्रीव पाटील, सुरेश वैरागर, रमेश शिंदे, संजय तळेकरी, सुरज देशमाने, दत्तात्रय डोके, तानाजी हावळे, संदीप रोकडे, दीपक कांबळे, सुधाकर कदम, संग्राम पवार, नानासाहेब वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत सांगितले की, वारंवार निवेदने देऊनही प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. महापालिकेने निश्चित कालमर्यादेत ठोस निर्णय घेऊन विकासकामे सुरू न केल्यास यापेक्षाही तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल.
मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शांततेत पार पडलेल्या या आंदोलनातून घरकुल परिसरातील नागरिकांनी आपल्या प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीच्या कारवाईची जोरदार मागणी केली.
