पिंपरी-चिंचवड शहरात अवैध शस्त्र बाळगणे आणि अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत एक विधीसंघर्षित बालक ताब्यात घेण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्रांती चौक ते पंतप्रधान आवास योजनेकडे जाणाऱ्या रस्त्यालगत शिर्के कन्स्ट्रक्शन लेबर कॅम्पजवळ पोलिसांनी सापळा रचून एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे ४० हजार ५०० रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लागू असलेल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत, सांगवी पोलिसांनी जुनी सांगवी येथील दत्त आश्रम मठासमोरील मोकळ्या जागेत कारवाई करून गणेश बालाकृष्ण पडाची (वय ३६, रा. पिंपळे गुरव) याला अटक केली. त्याच्या ताब्यातून एक लोखंडी कोयता जप्त करण्यात आला. शहरात लागू असलेल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, अंमली पदार्थ विरोधी पथकाने दापोडी परिसरात पहाटे केलेल्या कारवाईत आर्यन रविंद्र यादव (वय २०) आणि शोएब शकील शेख उर्फ वस्ताद (वय २५) या दोघांना अटक केली. आरोपींकडून ९८.५६ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) हा सुमारे १०.८५ लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थ, एक दुचाकी आणि मोबाईल जप्त करण्यात आला. प्राथमिक चौकशीत हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आणल्याची माहिती समोर आली असून, पोलिसांकडून या रॅकेटचा पुढील तपास सुरू आहे. आरोपींवर एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.