दिघी : डिलिव्हरी फ्रँचायझी मिळवून मोठा आर्थिक फायदा करून देण्याचे आमिष दाखवत एका व्यावसायिकाची ५ लाख २२ हजार ८३७ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अतुल नामदेव वहिले (वय ३८, रा. व्हिजन रिदम सोसायटी, डुडुळगाव, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सौरभ कुमार, प्रियांका सिंग, alliances@delhivery.com या ई-मेल आयडीचा वापर करणारी व्यक्ती तसेच फसवणुकीसाठी वापरण्यात आलेल्या बँक खात्यांचे धारक अशा संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६(सी) व ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी इन्स्टाग्रामवरील Delhivery Franchise संदर्भातील जाहिरात पाहिल्यानंतर आरोपींशी संपर्क साधला. त्यानंतर व्हॉट्सअॅप कॉल, संदेश आणि ई-मेलद्वारे फ्रँचायझी व्यवसायातून मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. विश्वास संपादन करण्यासाठी विविध कागदपत्रेही पाठविण्यात आली.
आरोपींच्या सांगण्यानुसार फिर्यादी यांनी २१ मे ते २० जून २०२६ या कालावधीत विविध बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने एकूण ५ लाख २२ हजार ८३७ रुपये जमा केले. मात्र फ्रँचायझी न देता तसेच गुंतवलेली रक्कम परत न करता आरोपींनी आर्थिक फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.या प्रकरणाचा पुढील तपास दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भोईर करीत आहेत.