२४ तासांत कारवाई न झाल्यास महापालिका मुख्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा इशारा
पिंपरी, दि. ११ ऑगस्ट २०२६ : प्रभाग क्रमांक १, चिखली येथील म्हेत्रेवस्ती परिसरात एका निष्पाप लहान मुलीवर ७ ते ८ भटक्या कुत्र्यांनी हिंसक हल्ला करून तिला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जखमी बालिकेवर रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेमुळे चिखली परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणात निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित महापालिका अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी लोकप्रतिनिधी व शिक्षण समिती सदस्यांनी केली आहे.
याबाबत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त तसेच पशुवैद्यकीय विभागाच्या उपायुक्तांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी प्रभागनिहाय विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली असतानाही चिखली परिसरात कुत्र्यांचा वाढता उपद्रव नियंत्रणात आणण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
म्हेत्रेवस्ती परिसरातील घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने विशेष पथक तैनात करावे, तसेच हिंसक आणि पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय प्रभाग क्रमांक १ मधील भटक्या कुत्र्यांचे नियोजन व नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांच्या कामाची चौकशी करून दोष आढळल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
चिखली परिसरात भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरणाची विशेष मोहीम युद्धपातळीवर राबवावी, तसेच या मोहिमेचा दैनंदिन अहवाल प्रशासनाने सादर करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने २४ तासांच्या आत ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा संतप्त नागरिकांना सोबत घेऊन महापालिका मुख्यालयासमोर तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी महापालिका प्रशासनाने केवळ कागदोपत्री कारवाई न करता प्रत्यक्ष आणि परिणामकारक उपाययोजना करणे आवश्यक असल्याची भूमिका निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
