जागतिक आदिवासी दिनानिमित्त देहूगाव येथे मार्गदर्शन मेळावा; पदवीधरांचा सन्मान
देहूगाव, प्रतिनिधी : आदिवासी पारधी समाजातील युवकांनी शिक्षणाच्या माध्यमातून पुढे येत समाजाची नवीन पिढी घडविण्यासाठी योगदान द्यावे. समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण हेच सर्वात प्रभावी माध्यम असून, युवकांनी विविध क्षेत्रांत आपले स्थान निर्माण करावे, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते धर्मपाल तंतरपाळे यांनी केले.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी पारधी समाज सुरक्षा दल व आदिवासी युवा विकास संघाच्या वतीने देहूगाव येथील राधाकृष्ण लॉन्स येथे मार्गदर्शन मेळावा व समाजातील पदवीधरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाची प्रस्तावना व संयोजन करताना अध्यक्ष माऊली उर्फ किसन भोसले यांनी सांगितले की, आदिवासी पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणणे हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय सामाजिक व शैक्षणिक कार्य करणाऱ्या मान्यवरांचे मार्गदर्शन समाजातील युवकांना मिळावे आणि त्यांच्या विचारांचा व कार्याचा आदर्श घेऊन समाजाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे होते. यावेळी विविध सामाजिक, शैक्षणिक व कामगार चळवळीतील नेते तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले.
प्रमुख मार्गदर्शक धर्मपाल तंतरपाळे यांनी आपल्या मनोगतात पारधी समाजातील युवकांनी शिक्षणाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “आदिवासी पारधी समाजाकडे उपलब्ध असलेली सर्वात मोठी संधी आणि ताकद ही शिक्षणाची आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे; जो पिल तो डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही.” युवकांनी शिक्षण घेऊन समाजाच्या विकासात सक्रिय योगदान द्यावे, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी कामगार नेते यशवंतराव भोसले यांनीही मार्गदर्शन केले. पारधी समाजातील नवीन पिढी शिक्षणाकडे वळत असून, ही सकारात्मक बाब आहे. समाजातील अधिकाधिक युवकांनी उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर, वकील, अभियंता, जिल्हाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांसारख्या विविध क्षेत्रांत अधिकारी व व्यावसायिक म्हणून पुढे यावे. त्यातूनच पारधी समाज मुख्य प्रवाहात येऊन समाजाचा सर्वांगीण विकास साध्य होईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार व प्रसिद्ध शिवव्याख्याते अनिल वडघुले, शैलेंद्र मोरे, प्रवीण भोसले, देहू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चेतन कोंडे, नगरसेवक कुणाल वाव्हळकर, नगरसेविका अनुराधा गोरखे, प्रा. युवराज तिकटे, देहूगावच्या नगराध्यक्षा पूजा दिवटे, पथविक्रेता समिती सदस्य प्रल्हाद कांबळे, उत्तमरंगा सकटे, पत्रकार लहू आडसूळ, विशाल भोसले तसेच कार्यक्रमाचे निमंत्रक अंकुश भोसले यांनी उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात समाजातील पदवीधरांचा सन्मान करण्यात आला. तसेच महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. उपस्थित महिलांना वृक्षरोपणासाठी रोपे देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास हिराज पवार, दीपक काळे, योगेश पवार, मॅनेजर भोसले, पत्रकार भीमराव बरकडे, सोमनाथ काळे, बी. के. भालेराव, दस्तगीर काळे, अनिल पवार, ओमकार काळे, मीटर पवार, दिनेश काळे, नागेश भोसले, राजेश ढावरे, संघटनेच्या अध्यक्षा शन्नू भोसले, महिला उपाध्यक्षा शैला शिंदे, महिला संघटक शारदा काळे, जय रविराज भोसले, अनुराग पवार, हर्षल चव्हाण, राकेश चव्हाण, किशोर भोसले, प्रीतम भोसले, शुभम रमेश भोसले, शेखर चव्हाण, ओम चव्हाण, छबू चव्हाण, लांगसाहेब भोसले, भाऊलाल चव्हाण, नोतन भोसले, रमेश भोसले, शरद चायडू भोसले, सोनू चव्हाण, राम चव्हाण, अमोल भोसले, आकाश भोसले, यश चव्हाण, फरीदा चव्हाण, सुगंधा भोसले, निर्मला भोसले, रंजना काळे, उषा चव्हाण, सारिका भोसले, अर्जुन पवार यांच्यासह हजारो कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.
“शिक्षणातूनच समाजाची नवी ओळख निर्माण होईल”
जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आयोजित या मेळाव्यातून पारधी समाजातील युवकांना शिक्षण, सामाजिक प्रगती आणि मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा संदेश देण्यात आला. पदवीधरांचा सन्मान आणि महिलांचा सहभाग यामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
