पुणे प्रतिनिधी : गणेश चतुर्थीच्या पावन पर्वानिमित्त ‘द ब्लेस्ड वन्स’च्या पुणे, मुंबई, नवी मुंबई, नागपूर, ग्रेटर नोएडा आणि पटना येथील केंद्रांमध्ये गणपती बाप्पांच्या स्वागताचा उत्साह पाहायला मिळाला. केंद्रातील विशेष मुलांनी फुले, रोषणाई आणि आकर्षक सजावटीने परिसर सजवत बाप्पांच्या आगमनाची जय्यत तयारी केली.
मात्र, या मुलांसाठी गणेशोत्सव हा केवळ एक धार्मिक सण नाही, तर त्यांच्या भावविश्वाशी जोडलेला एक खास अनुभव आहे. गणपती बाप्पांचे त्यांच्याशी असलेले नाते ‘अलग, पर कम नहीं’ हा संदेश देणारे ठरते.
भगवान गणेशांचे शरीर मानवी असून मस्तक हत्तीचे आहे. ते इतर देवतांपेक्षा वेगळे दिसतात; मात्र कोणत्याही शुभकार्याच्या प्रारंभी त्यांचीच पूजा केली जाते. त्यांच्या वेगळेपणाला कधीही कमीपणाचे स्वरूप दिले जात नाही. याच भावनेतून ‘द ब्लेस्ड वन्स’ विशेष मुलांना शिकवते की, वेगळे असणे ही चूक नाही आणि स्वीकारले जाण्यासाठी स्वतःला बदलण्याची गरज नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्या वेगळेपणासह सन्मानाची आणि प्रेमाची हकदार आहे.
गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी पाचही शहरांतील केंद्रांमध्ये मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला. फुले, रंगीबेरंगी सजावट आणि रोषणाई करताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह स्पष्टपणे जाणवत होता. त्यांच्या या सहभागातून शब्दांपलीकडचा आनंद आणि आपलेपणाची भावना व्यक्त झाली.
‘द ब्लेस्ड वन्स’चे संस्थापक अभिमतेज प्रियदर्शी यांनी सांगितले की, “विशेष मुलांचे वेगळेपण हीच त्यांची सुंदरता आहे. गणपती बाप्पांचा संदेशही प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करण्याचा आहे. वेगळे असणे किंवा कमी असणे असा प्रश्नच नाही; प्रत्येक व्यक्तीची स्वतःची ओळख, क्षमता आणि वैशिष्ट्य असते.”
या उपक्रमातून गणपती बाप्पांचे स्वागत करण्याबरोबरच विशेष मुलांची ओळख, क्षमता आणि त्यांच्या वेगळेपणाचा सन्मान करण्याचा संदेश देण्यात आला. बाप्पांच्या स्वागताच्या निमित्ताने या मुलांनी समाजाला एक सुंदर संदेश दिला—वेगळे असणे म्हणजे कमी असणे नव्हे; प्रत्येक व्यक्ती तितकीच खास आहे.
