दुसऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून वाद; भिंतीवर डोके आपटून गळा आवळल्याचा आरोप
पिंपरी-चिंचवड : हिंजवडी परिसरात प्रेमसंबंधातून झालेल्या वादाचे रूपांतर भीषण घटनेत झाले असून, एका २७ वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी ३० वर्षीय तरुणाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम ज्ञानेश्वर काळभांडे (वय ३०, रा. हिंजवडी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर कोमल राजेंद्र ढहाके (वय २७) असे मृत तरुणीचे नाव आहे. आरोपी आणि कोमल यांच्यात प्रेमसंबंध होते.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, आरोपीचे अन्य एका मुलीसोबतही प्रेमसंबंध असल्याचा संशय कोमलला होता. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने कोमलला भिंतीवर ढकलून तिचे डोके आपटले. तसेच तिच्या गळ्याभोवती ओढणी आवळून आणि चेहऱ्यावर हाताने बुक्क्यांनी मारहाण करून तिचा खून केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
ही घटना २३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास हिंजवडी येथील एका पीजीमधील खोलीत घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी २३ नोव्हेंबर रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे हिंजवडी परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.
