गुरुजी तालीम मंडळाची यंदा जगन्नाथ मंदिराची आकर्षक आरास; पोलिसांचा चोख बंदोबस्त
पुणे प्रतिनिधी : पुणे शहरातील लक्ष्मी रस्त्यावर विराजमान असलेल्या मानाच्या तिसऱ्या गणपती गुरुजी तालीम मंडळाच्या गणरायाच्या दर्शनासाठी गणेशभक्तांची प्रचंड गर्दी होत आहे. यंदा मंडळाकडून जगन्नाथ मंदिराची आकर्षक आरास साकारण्यात आली असून, ही आरास भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्त मोठ्या संख्येने लक्ष्मी रस्त्यावर दाखल होत असून, गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागत आहेत. मंडळाचे अध्यक्ष प्रविणशेठ परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी नियोजन केले आहे.
गर्दीचे व्यवस्थापन, दर्शन व्यवस्था तसेच परिसरातील शिस्त आणि सुरक्षितता याकडे मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून विशेष लक्ष दिले जात आहे. दरम्यान, कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पोलिसांकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
जगन्नाथ मंदिराच्या प्रतिकृतीच्या रूपातील आरास पाहण्यासाठी आणि मानाच्या तिसऱ्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी पुणे शहरासह परिसरातून भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. त्यामुळे लक्ष्मी रस्त्यासह परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे.
