मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा निर्णय; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
पिंपरी : गणेश विसर्जनाच्या मिरवणुकांदरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेने शहरातील विविध भागांतील वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत. भोसरी, चिखली, तळेगाव, सांगवी, वाकड, निगडी, हिंजवडी आणि पिंपरी वाहतूक विभागाच्या हद्दीत एकूण ४६ ठिकाणी वाहनांना प्रवेशबंदी व वाहतूक वळविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पोलीस उपआयुक्त (वाहतूक) विक्रांत देशमुख यांनी मोटार वाहन कायद्यानुसार ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे. मिरवणुकीच्या मार्गावर नागरिकांची गर्दी होऊन वाहतूक विस्कळीत होऊ नये तसेच विसर्जन मिरवणुका सुरळीत पार पडाव्यात, यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.
भोसरी परिसरात बदल
भोसरी वाहतूक विभागाच्या हद्दीत खडकीकडून हॅरिस ब्रिजमार्गे सर्व्हिस रोडने फुगेवाडीकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या वाहनांनी ग्रेड सेपरेटरमार्गे फुगेवाडी चौकातून पुढे जावे. तसेच दापोडी शितळादेवी चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी असून, वाहनचालकांनी सांगवीमार्गे पर्यायी मार्गाचा वापर करावा.
भोसरी ब्रीजखाली जाणाऱ्या काही मार्गांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. पीएमपीएमएल बससाठीही काही मार्गांमध्ये बदल करण्यात आले असून, संबंधित बसेसना पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
चिखली, मोशी परिसरात निर्बंध
डुडूळगावकडून जुन्या मोशी-आळंदी रोडने हवालदार वस्ती चौक ते मोशी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना तसेच पुणे-नाशिक महामार्गावरून जुन्या मोशी-आळंदी रोडने जाणाऱ्या वाहनांना निर्धारित वेळेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. वाहनचालकांनी भोसरी ओव्हरब्रिज, लांडेवाडी चौक, बाबर पेट्रोल पंप आदी पर्यायी मार्गांचा वापर करावा.
बोऱ्हाडेवाडी चौकात अवजड वाहनांना प्रवेशबंदी असून, ही वाहने मातेरे हाऊस चौकातून पुढे जातील.
तळेगाव-चाकण मार्गावर जड वाहनांना बंदी
तळेगाव ते एच.पी. चौक दरम्यानच्या मार्गावर जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मुंबईकडून येणाऱ्या जड वाहनांना वडगाव फाटा, वडगाव कमान, तळेगाव एमआयडीसी, नवलाख उंब्रे, बधलवाडी, भामचंद्र डोंगर, वासुली फाटा मार्गे एच.पी. चौकाकडे जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच चाकणकडून तळेगावकडे जाणाऱ्या जड वाहनांसाठीही पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
सांगवी परिसरातील प्रमुख मार्ग बंद
जुनी सांगवीतील माहेश्वरी चौक ते माकण (संविधान) हॉस्पिटल चौक, शनि मंदिर फाटा, फेमस चौक, क्रांती चौक, कृष्णा चौक आदी मार्गांवर गरजेनुसार वाहतूक बंद किंवा वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी काटेपुरम चौक, मयूरनगरी, ढोरे फॉर्म, महात्मा फुले ब्रिज आदी पर्यायी मार्गांचा वापर करावा.
साई चौक-कृष्णा चौक, शितोळे पेट्रोल पंप ते बँक ऑफ महाराष्ट्र चौक, रहाटणी फाटा परिसरातही वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध राहणार आहेत.
वाकडमध्ये दत्तमंदिर रोडकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी
वाकड वाहतूक विभागाच्या हद्दीत अण्णाभाऊ साठे चौक, वाकड चौक, उत्कर्ष चौक आदी ठिकाणांहून दत्तमंदिर रोडकडे जाणाऱ्या वाहनांना ठराविक वेळेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. वाहनचालकांनी कावेरीनगर, काळाखडक चौक, कस्पटे कॉर्नर आदी पर्यायी मार्गांचा वापर करावा.
निगडीतील चाफेकर चौक परिसरात मोठे बदल
निगडी वाहतूक विभागाच्या हद्दीत २५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत अहिंसा चौक, दळवीनगर ब्रिज, वाल्हेकरवाडी, लिंकरोड, भोई आळी, गांधी पेठ आदी मार्गांवरून चाफेकर चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
वाहनचालकांनी एस.के.एफ. चौक, खंडोबामाळ, बिजलीनगर, काळेवाडी, केशवनगर तसेच वाल्हेकरवाडीमार्गे पर्यायी मार्गांचा वापर करावा.
हिंजवडीतही वाहतुकीत बदल
हिंजवडी वाहतूक विभागाच्या हद्दीत फेज-३, टाटा टी जंक्शन, जॉमेट्रिक सर्कल, शिवाजी चौक, मेझा-९, इंडियन ऑईल चौक, कस्तुरी चौक आदी परिसरातील वाहतूक टप्प्याटप्प्याने वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी लक्ष्मी चौक, विनोदे वस्ती चौक, विप्रो सर्कल, टाटा टी जंक्शन आदी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पिंपरी परिसरातही वाहतूक वळविणार
पिंपरी वाहतूक विभागाच्या हद्दीत पवनेश्वर मंदिर ते सर्जा हॉटेल, काळेवाडी पूल ते डिलक्स चौक, कराची चौक, रिव्हर रोड तसेच पिंपरी पूल ते शगुन चौक, आर्य समाज चौक, साई चौक या मार्गांवर वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या वेळी पिंपरी चौक व गोकुळ हॉटेलकडून येणारी वाहने पिंपरी पुलावरून भाटनगरमार्गे वळविण्यात येणार आहेत.
अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना अपवाद
गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने अधिसूचनेत नमूद केलेल्या ठिकाणी संबंधित दिवशी व वेळेत अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर वाहनांना तात्पुरती प्रवेशबंदी राहणार आहे. पोलिसांकडून आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेडिंग, दिशादर्शक फलक आणि बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात येणार आहे.
नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, मिरवणूक मार्गावर अनावश्यक गर्दी करू नये आणि प्रवास करताना शक्यतो निर्धारित पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.
