गुन्हे शाखा युनिट-४ची कारवाई; अनेक वर्षांपासून होता फरार
पिंपरी : निगडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोका (MCOCA) प्रकरणातील अजामीनपात्र वॉरंट बजावलेल्या सराईत आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट-४ने पनवेल येथून ताब्यात घेतले. मोहसीन हमीद मुलानी (वय ४१, रा. इंदुरी, ता. मावळ, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजि. नं. ३०३७/२००८ या प्रकरणात मोका न्यायालयातील प्रकरण क्रमांक १९९९/१००००४/२००८ मध्ये मुलानी याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट होते. तो गेल्या काही वर्षांपासून पोलिसांच्या हाती लागला नव्हता.
मुलानी याच्याविरुद्ध यापूर्वी खून, बलात्कार, खंडणी, अपहरण, मारामारी तसेच अग्निशस्त्राचा वापर यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वरिष्ठांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा युनिट-४च्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे त्याचा ठावठिकाणा निश्चित करण्यात आला. त्यानंतर पनवेल येथून पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी पुणे येथील मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश, मोका न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुन्हे शाखा युनिट-४चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पोलीस अंमलदार अमोल बोराटे, गणेश महाडीक, अमोल माटे, तांत्रिक विश्लेषक पोलीस शिपाई त्रिनयन बाळसराफ आणि पोलीस हवालदार नागेश माळी यांनी कारवाईत सहभाग घेतला.
