पिंपरी : चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखा, युनिट-३च्या पथकाने तब्बल दहा दिवस सातत्याने पाठपुरावा करून सुमारे १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे रेकॉर्डवरील आरोपींसह तिघांना ताब्यात घेत चैन स्नॅचिंग आणि दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. आरोपींकडून सोन्याचे मंगळसूत्र आणि होंडा युनिकॉर्न दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत झालेल्या चैन स्नॅचिंगच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा युनिट-३चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला होता. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६३२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सुमारे १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून संशयितांच्या हालचालींचा माग काढला. दरम्यान, २३ सप्टेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे व पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील तीन रेकॉर्डवरील आरोपी मोशीतील आदर्शनगर परिसरात असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी संघर्ष कॉलनी, आदर्शनगर, मोशी येथे सापळा रचून तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची नावे इंदर अनिल राजपूत (वय २२), महेश कान्हा राजपूत (वय २६) आणि एका विधिसंघर्षित बालक अशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी मोशीतील सेक्टर क्रमांक ४, प्राधिकरण परिसरात रात्रीच्या वेळी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेल्याची तसेच पुरंदर तालुक्यातील कोळविहरे येथून होंडा युनिकॉर्न दुचाकी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यांच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र आणि होंडा युनिकॉर्न दुचाकी पंचांसमक्ष जप्त करण्यात आली.
या कारवाईमुळे खालील दोन गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
१) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे गु.र.नं. ६३२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), ३(५).
२) जेजुरी पोलीस ठाणे गु.र.नं. २८४/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२).
पोलिसांच्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेले आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध दिघी, एमआयडीसी भोसरी, चाकण आणि वाकड पोलीस ठाण्यांत विविध कलमांन्वये गुन्हे दाखल आहेत.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जोनापल्ले करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोऱ्हाडे, अजित रुपनवर, बाळासाहेब भांगले, सुंदर थोरात, तुषार वराडे, दिलीप राठोड, स्वप्निल महाले, शशिकांत नांगरे आणि सचिन गोनटे यांच्या पथकाने केली.
