जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली होती. मात्र आता राज्यात मान्सूनने जोरदार पुनरागमन केले असून, अनेक जिल्ह्यांत चांगल्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः ३ ते ७ जुलैदरम्यान विदर्भ विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याआधी पुढील दोन ते तीन दिवस अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनीही ३ ते ७ जुलैदरम्यान राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मते पुणे,मुंबई,अकोला,अहिल्यानगर), नांदेड, नाशिक नंदुरबार, धुळे, जळगाव,छ.संभाजीनगर या भागांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, यंदाच्या जून महिन्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने राज्यात पर्जन्यमानाची लक्षणीय तूट निर्माण झाली आहे. विशेषतः विदर्भात सुमारे ५० टक्के पावसाची कमतरता नोंदवली गेली असून, ही तूट अल्पावधीत भरून निघणे कठीण असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
