पिंपरी, : पिंपळे गुरव परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून एका व्यक्तीचा निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी एका महिलेला अटक करून तिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
सांगवी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ३०३/२०२६ नुसार, दि. २८ जून रोजी पहाटे सुमारे २.३० वाजता वैष्णवी दुकानाजवळ, लक्ष्मीनगर लेन क्रमांक ४, पिंपळे गुरव येथे ही घटना घडली. या प्रकरणी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विजय सर्जेराव शेलार यांनी फिर्याद दिली असून, भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३(१) तसेच आर्म्स अॅक्ट कलम ४(२५) व २७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी सेत्वराज राजंगम (वय ५२, रा. वैष्णवी दुकानाजवळ, लक्ष्मीनगर लेन क्र. ४, पिंपळे गुरव) या महिलेला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला आणि कन्नन बालकृष्ण पडाची (मयत) यांच्यात प्रॉपर्टीच्या कारणावरून वाद झाला. या वादाचे पर्यवसान हिंसाचारात होऊन आरोपीने प्रथम दगडी पाट्याने कन्नन यांच्या डोक्यावर वार केला. त्यानंतर लोखंडी कोयत्याने मानेवर वार करून त्यांचा खून केल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर सांगवी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी महिलेला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) नांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे
