पिंपरी प्रतिनिधी : संत तुकाराम व्यापारी संकुल, निगडी येथील शांता शेळके सभागृहासाठी ज्येष्ठ नागरिक, साहित्यिक, दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ महिलांच्या सोयीसाठी स्वतंत्र लिफ्ट (उद्वाहक) बसविण्याची मागणी महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र साहित्य परिषद ही मराठी भाषेतील आद्य व मातृसंस्था असून तिची स्थापना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुढाकाराने २७ मे १९०६ रोजी झाली आहे. संस्थेला ११९ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभली असून पिंपरी-चिंचवड शाखा गेली ३५ वर्षे साहित्य, संस्कृती आणि वाचन चळवळीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे.
परिषदेचे साहित्यिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम संत तुकाराम व्यापारी संकुलातील शांता शेळके सभागृहात नियमितपणे आयोजित केले जातात. मात्र हे सभागृह दुसऱ्या मजल्यावर असल्याने ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ साहित्यिक, दिव्यांग व्यक्ती तसेच ज्येष्ठ महिलांना जिना चढणे-उतरणे अत्यंत कष्टदायक ठरत आहे. या गैरसोयीमुळे अनेक मान्यवर साहित्यिक आणि ज्येष्ठ नागरिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास असमर्थ ठरत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहराने भौतिक विकासाबरोबरच साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातही मोठी प्रगती केली असून शहरातील प्रतिष्ठित साहित्य संस्थेच्या उपक्रमांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे परिषदेने म्हटले आहे.
त्यामुळे संत तुकाराम व्यापारी संकुलातील शांता शेळके सभागृहासाठी दुसऱ्या मजल्यापर्यंत स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेने महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
