‘बिडी, तंबाखू पुडी आणि पेयाच्या बाटल्यां’वरून पोलिसांनी शोधला धागा; १२ गुन्हे उघड, चोरीच्या केबल्स जप्त
पुणे ग्रा.नारायणगाव, प्रतिनिधी : ऐन उन्हाळ्यात जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकणाऱ्या केबल चोरी प्रकरणाचा अखेर पर्दाफाश करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना मोठे यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मध्य प्रदेशातील आंतरराज्य केबल चोरट्यांच्या टोळीतील पाच जणांना अटक केली असून, या कारवाईमुळे केबल चोरीचे तब्बल १२ गुन्हे उघडकीस आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आरज्या छत्तेसिंग पवार (वय १९, रा. कटनी, मध्य प्रदेश), गगन शापिलाल चौहान (वय १९, रा. खंडवा), अतुल शापिलाल चौहान (वय २१, रा. खंडवा), तपसलाल सर्कस पवार (वय ५०, रा. कटनी) आणि सुरज रामसर आदिवासी (वय ४०, रा. कटनी) यांचा समावेश आहे.
मागील काही महिन्यांपासून जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील नदीपात्र परिसरातील शेतीपंपांच्या केबल वायर चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. त्यामुळे सुमारे १५० शेतकरी अडचणीत सापडले होते. उन्हाळ्याच्या काळात पिकांना पाणी देणे कठीण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने तपास करण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने विविध घटनास्थळांची बारकाईने पाहणी केली. तपासादरम्यान घटनास्थळी आढळलेल्या बिडीची थोटके, विशिष्ट प्रकारच्या तंबाखूच्या पुड्या आणि पेयाच्या बाटल्या यांमुळे तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली.
स्थानिक भागात अशा वस्तूंचा वापर होत नसल्याने चोरी करणारी टोळी परराज्यातील असावी, असा पोलिसांना संशय आला. त्यानंतर गोपनीय माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही टोळी मध्य प्रदेशातील असून, चोऱ्या करण्यासाठी विविध भागांत फिरस्ते म्हणून राहत असल्याचे निष्पन्न झाले.
सध्या आरोपी नाशिक जिल्ह्यातील घोटी (इगतपुरी) परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिसांनी संयुक्त सापळा रचून पाचही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या केबल वायर जप्त करण्यात आल्या आहेत.
या कारवाईमुळे जुन्नर, नारायणगाव, ओतूर आणि पारगाव परिसरातील केबल चोरीचे १२ गुन्हे उघडकीस आले असून, आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे आणि धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, प्रवीण सपांगे तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने बजावली. सध्या सर्व आरोपी नारायणगाव पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.
