पुणे विभागातील कर्करोग रुग्णालयाच्या कामाला गती देणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
आळंदी प्रतिनिधी : कर्करोगाचे अचूक निदान आणि वेळेत उपचार मिळाल्यास रुग्णांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे पुणे विभागातील कर्करोग रुग्णालयाच्या उभारणीच्या कामाला तातडीने गती देण्यात येईल, असे आश्वासन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.
आळंदी येथील इंद्रायणी हॉस्पिटल अँड कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक PET-CT युनिटच्या लोकार्पण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी आमदार दिलीप वळसे-पाटील, बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन देवमाने, नगराध्यक्ष प्रशांत कुन्हाडे, विश्वस्त डॉ. संजय देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, देशात कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून अचूक निदान आणि वेळेवर उपचार अत्यंत आवश्यक आहेत. उपचाराला विलंब झाल्यास रुग्णांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाढतात. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमध्ये कर्करोग उपचारांचा समावेश करण्यात आला असून राज्य शासन उपचाराबरोबरच प्रतिबंध आणि लवकर निदानावरही विशेष भर देत आहे.
त्या म्हणाल्या की, महाकेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यस्तरीय कर्करोग उपचार व्यवस्था उभारण्यात येत आहे. तसेच नागपूर येथे हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आली असून त्यामुळे निदान, उपचार आणि संशोधनाला मोठी चालना मिळणार आहे.
रुग्णालयासाठी अत्याधुनिक PET-CT मशीन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत २७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या यंत्रामुळे कर्करोगाचे अचूक निदान होऊन आधुनिक उपचार अधिक प्रभावीपणे करता येणार असून सर्वसामान्य व गरजू रुग्णांना माफक दरात अत्याधुनिक आरोग्यसेवा मिळणार आहे.
आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी कर्करोग रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवास व्यवस्था उभारण्याची गरज व्यक्त केली. सेवाभावी संस्था आणि राज्य शासनाने संयुक्तपणे हे काम हाती घ्यावे, तसेच जिल्ह्यात अधिक सुसज्ज कर्करोग रुग्णालये उभारण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
बाबाजी काळे यांनी इंद्रायणी हॉस्पिटलच्या सामाजिक बांधिलकीचा गौरव करत आळंदी, खेड आणि परिसरातील रुग्णांना या संस्थेमुळे मोठा दिलासा मिळत असल्याचे सांगितले. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आणि डॉ. संजय देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कर्करोग रुग्णालयाची पाहणी करून उपलब्ध आरोग्य सुविधांची माहिती घेतली.
