१०० हून अधिक स्थानिक कामगारांच्या प्रश्नावर कामगार आयुक्तालयाला घेराव; डॉ. रुपेश नाठे पाटील यांचा कंपनी-प्रशासनाला इशारा
पिंपरी : स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारावर घाला घालून त्यांना रस्त्यावर आणण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा आक्रमक इशारा देत ‘स्वराज्य’च्या वतीने कामगार आयुक्तालयावर जोरदार घेराव आंदोलन करण्यात आले. कंपनीने कथितरीत्या बेकायदेशीर पद्धतीने कामावरून कमी केलेल्या १०० हून अधिक ‘ऑन-रोल’ स्थानिक कामगारांना तातडीने सेवेत पूर्ववत घ्यावे, या मागणीसाठी शेकडो कामगारांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
वर्षानुवर्षे कंपनीसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या स्थानिक कामगारांच्या हातातील रोजगार हिरावून घेण्यात आला. त्यामुळे अनेक कुटुंबांचे घरभाडे व कर्जाचे हप्ते थकले आहेत, वृद्ध आई-वडिलांच्या उपचारांचा प्रश्न गंभीर बनला आहे, तर मुलांच्या शिक्षणापासून घरातील दैनंदिन खर्चापर्यंत सर्वच बाबींवर आर्थिक संकट कोसळले आहे. कामगारांच्या या वेदनांना जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करत ‘स्वराज्य’ने कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासनाला धारेवर धरले.
‘ऑन-रोल’ कामगारांना कंत्राटी बनवण्याचा डाव हाणून पाडणार!
स्थानिक तरुणांना त्यांच्या हक्काच्या कायमस्वरूपी रोजगारापासून दूर करून कंत्राटी पद्धतीच्या जोखडात ढकलण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा ‘स्वराज्य’चे नेते डॉ. रुपेश नाठे पाटील यांनी दिला.
“भूमिपुत्रांच्या घामावर कंपन्यांनी साम्राज्य उभे करायचे आणि त्याच भूमिपुत्रांना रोजगारापासून वंचित करायचे, हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. कामगारांना त्यांच्या मूळ ‘ऑन-रोल’ पदावर सन्मानाने तातडीने रुजू करून घ्या; अन्यथा ‘स्वराज्य’चा लढा अधिक तीव्र होईल,”
……डॉ. नाठे पाटील.
प्रशासनाने केवळ कागदी कारवाई करून वेळकाढूपणा न करता कामगारांच्या प्रश्नावर ठोस निर्णय घ्यावा. कंपनी व्यवस्थापनानेही कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात रस्त्यावर उतरून निर्णायक संघर्ष उभारला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कामगारांच्या अश्रूंनी व्यवस्थेला सवाल
आंदोलनादरम्यान अनेक बाधित कामगारांनी आपली व्यथा मांडली. रोजगार गेल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, कर्जाचे हप्ते कसे फेडायचे आणि वृद्ध पालकांचे उपचार कसे करायचे, असा सवाल करत काही कामगार भावुक झाले. “आमचा रोजगार परत द्या; आमच्या कुटुंबांना वाऱ्यावर सोडू नका,” अशी आर्त मागणी त्यांनी केली.
दरम्यान, प्रशासनाने आणि कंपनी व्यवस्थापनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन कामगारांना न्याय दिला नाही, तर आंदोलनाची पुढील दिशा अधिक तीव्र असेल, असा इशारा ‘स्वराज्य’च्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
या आंदोलनात डॉ. रुपेश नाठे पाटील, केशव गोसावी, ज्ञानेश्वर थोरात, रोशन खैरे, नितीन पाटील, संदीप अवारे, रेखा जाधव, रागिणी आहेर, विजय खर्जुल, निखिल सातपुते, विशाल पवार, स्वप्नील आहेर, रोहिदास टिळे, कामगार वैभव दातीर, खडू पाटील, महेंद्र पवार, सागर पाटील, अशोक माळी, संदीप भगत, सुनील वराडे, विलास कातोरे, संतोष जगताप यांच्यासह शेकडो बाधित कामगार आणि ‘स्वराज्य’चे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
