पुणे, दि. २८ जून : फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये ३५ ते ४० टक्क्यांहून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका उद्योजकाची तब्बल ८८ लाख १९ हजार रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात सायबर गुन्हा क्रमांक २१/२०२६ नोंद करण्यात आला आहे.
फिर्यादी अभिनीत प्रकाश कुलकर्णी (वय ४८, व्यवसाय – उद्योजक, रा. विवा हॉलमार्क, डीएसके रानवारा रोड, बावधन, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २ जून २०२५ ते २५ जून २०२६ या कालावधीत आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधला.
आरोपींनी स्वतःला फॉरेक्स ट्रेडिंगशी संबंधित असल्याचे सांगत, गुंतवणुकीवर ३५ ते ४० टक्क्यांपेक्षा अधिक परतावा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी एका वेबसाइटवर खाते उघडण्यास सांगण्यात आले. त्यानंतर व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामद्वारे विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले.
फिर्यादी यांनी टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम भरल्यानंतर ती परत काढण्यासाठी विविध कर (टॅक्स) आणि शुल्क भरण्याचे कारण सांगून आणखी पैसे उकळण्यात आले. अशा प्रकारे आरोपींनी एकूण ₹८८,१९,००० उकळून ती रक्कम परत न करता आर्थिक फसवणूक केली.
या प्रकरणी दिव्या अग्रवाल शर्मा, संबंधित वेबसाइटचे धारक, विविध बँक खातेदार आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१६(२), ३१८(४), ३१८(५), माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(सी), ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
