जुन्नर प्रतिनिधी.दि. २० जुलै : जुन्नर तालुक्यातील श्रीक्षेत्र खामुंडी येथील स्वयंभू काळभैरवनाथ मंदिराची भव्य आणि हुबेहूब प्रतिकृती यंदाच्या पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवात मुख्य आकर्षण ठरणार आहे. पुण्यातील नवग्रह गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या देखाव्यासाठी या ऐतिहासिक मंदिराची निवड केली असून, या निर्णयामुळे खामुंडी गावासह संपूर्ण जुन्नर तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
नुकतेच जीर्णोद्धार झालेल्या स्वयंभू काळभैरवनाथ मंदिराच्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तुशिल्पाचा आणि अप्रतिम कलाकुसरीचा देखावा पुण्यात साकारला जाणार आहे. या माध्यमातून मंदिराच्या वैभवाला राज्यभरात नवी ओळख मिळणार असून, मंदिराच्या जतन व संवर्धनासाठी ग्रामस्थांनी घेतलेल्या परिश्रमांचाही गौरव होणार आहे.
या भव्य देखाव्याची निर्मिती पुण्यातील सुप्रसिद्ध कलावंत सुशील निनादे यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाणार आहे. मंदिराची प्रतिकृती वास्तवदर्शी आणि मूळ वास्तूशी मिळतीजुळती दिसावी यासाठी मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्यांनी गेल्या दीड महिन्यांपासून खामुंडी येथे वारंवार भेटी देत मंदिराची रचना, वास्तुकला आणि कलात्मक बारकावे यांचा सखोल अभ्यास केला आहे.
अभ्यासानंतर लाखो रुपयांचा खर्च करून श्रीक्षेत्र खामुंडी येथील मंदिराचा भव्य देखावा पुण्यात उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे गणेशोत्सवादरम्यान हजारो भाविक आणि गणेशभक्तांना या ऐतिहासिक मंदिराच्या प्रतिकृतीचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.
ग्रामीण भागातील धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीतील नामांकित सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून राज्यभर पोहोचणार असल्याने खामुंडी गावातील ग्रामस्थ, मंदिर ट्रस्ट तसेच जुन्नर तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यंदाच्या गणेशोत्सवात श्रीक्षेत्र खामुंडीच्या स्वयंभू काळभैरवनाथ मंदिराचा देखावा भाविकांसाठी प्रमुख आकर्षण ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.