गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि शिक्षकांचा सन्मान
पुणे (पुरंदर) प्रतिनिधी,दिवे …..महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त आणि गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत श्री कातोबा हायस्कूल, दिवे येथे इयत्ता दहावी सन १९८६ च्या माजी विद्यार्थी बॅचच्या वतीने प्रेरणादायी सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिक्षणाबद्दलची कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या उपक्रमांतर्गत शाळेतील ४० गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वह्या, पेन तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच सन २०२६ च्या दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या चार गुणवंत विद्यार्थ्यांचा स्कूल बॅग आणि महापुरुषांच्या विचारांची पुस्तके भेट देऊन विशेष गौरव करण्यात आला.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शाळेचे मुख्याध्यापक दादासाहेब साठे, सर्व शिक्षक-शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करत शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव केला.
कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब पवार, माजी आदर्श शिक्षिका इंदिरा पवार, डॉ. सुहास होले, सामाजिक कार्यकर्ते गणपत आण्णा शितकळ, भाऊसाहेब झेंडे, पोलीस पाटील बाळासाहेब झेंडे, माजी सरपंच बापूसाहेब टिळेकर, अनिल टिळेकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
गोकुळ टिळेकर, हरिभाऊ राऊत आणि इतर माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सुजाता काळभोर यांनी केले.हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची प्रेरणा निर्माण करणारा आणि गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा ठरला.
