महानगरपालिकेच्या मुद्रेवरील शिवप्रतिमेला साजेसा निर्णय घ्यावा; मारुती भापकर यांचे महापालिका पदाधिकाऱ्यांना निवेदन
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी….पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ऑटो क्लस्टरसमोरील नवीन प्रशासकीय मुख्यालयासमोर महाराष्ट्राचे आराध्य दैवत, युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठित भव्य पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती साहेबराव भापकर यांनी महापौर, आयुक्त तसेच महापालिकेतील सर्व पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भापकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापनेपासून महानगरपालिकेच्या अधिकृत मुद्रेवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. त्यामुळे नवीन प्रशासकीय मुख्यालयासमोर महाराजांचा सिंहासनाधिष्ठित भव्य आणि प्रेरणादायी पुतळा उभारणे हे शहराच्या इतिहासाला, संस्कृतीला आणि अस्मितेला साजेसे ठरेल.
छत्रपती शिवाजी महाराजांनी न्याय, शिस्त, पारदर्शकता, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, महिलांचा सन्मान आणि रयतेच्या हिताचा आदर्श राज्यकारभार घडवून दाखविला. त्यांच्या विचारांचा प्रेरणादायी वारसा नवीन मुख्यालयात कार्यरत असलेल्या लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सदैव मार्गदर्शक ठरेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच महानगरपालिकेच्या मुख्यालयात होणाऱ्या प्रत्येक महत्त्वाच्या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून करण्यात यावी, तसेच नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनीही महाराजांना अभिवादन करून आपल्या कार्याची सुरुवात करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
या ऐतिहासिक आणि अस्मितेच्या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक ती कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करून नवीन प्रशासकीय मुख्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य सिंहासनाधिष्ठित पुतळा उभारण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी मारुती भापकर यांनी केली आहे.
