चिंचवडगाव : प्रतिनिधी…..चिंचवडगावातील मोरया हॉस्पिटलसमोरील बस स्थानकाची दुरवस्था झाल्याने दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बस स्थानकावर कोणत्या मार्गाची बस येणार, बसचा क्रमांक कोणता आहे आणि ती कोणत्या ठिकाणी जाणार आहे, याबाबतची कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने प्रवाशांचा गोंधळ उडत आहे.
विशेष म्हणजे, बस स्थानकावरील माहिती फलक जीर्ण अवस्थेत असून काही ठिकाणी तो पूर्णपणे गायब आहे. त्यामुळे नवीन प्रवासी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच विद्यार्थ्यांना योग्य बस ओळखणे कठीण जात आहे. याशिवाय प्रवाशांच्या बसण्यासाठी असलेले बाकडेही तुटलेल्या अवस्थेत असल्याने नागरिकांना उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे.
हे बस स्थानक चिंचवडगावातील महत्त्वाच्या ठिकाणी असून येथून दररोज हजारो नागरिक प्रवास करतात. तरीही मूलभूत सुविधांकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते श्री. राकेश सायकर यांनी संबंधित प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन बस स्थानकावरील माहिती फलक तातडीने अद्ययावत करावेत, बस मार्ग व क्रमांक दर्शविणारे फलक बसवावेत आणि तुटलेले बाकडे दुरुस्त करून प्रवाशांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे.
