पिंपरी-चिंचवड महिला काँग्रेसचे पोलीस आयुक्तांना निवेदन; कठोर कारवाईची मागणी
पिंपरी, (प्रतिनिधी) : पत्रकारांना अर्वाच्य शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असलेल्या खासदार संजय दिना पाटील यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सायली नढे यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन गुरुवारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांना सादर करण्यात आले.
गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर तसेच विविध वृत्तवाहिन्यांवर खासदार संजय दिना पाटील यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यामध्ये ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना अर्वाच्य व अश्लील भाषा वापरत असल्याचे तसेच पत्रकारांना मारहाण करण्याची धमकी देत असल्याचे दिसून येत असल्याचा दावा महिला काँग्रेसने निवेदनात केला आहे. या घटनेमुळे पत्रकारांमध्ये तसेच नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सायली नढे यांनी म्हटले आहे की, लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारीची जाणीव ठेवण्याऐवजी पत्रकारांना उघडपणे शिवीगाळ करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे हे लोकशाही व्यवस्थेसाठी अत्यंत धोकादायक आहे. प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, त्यांचा अवमान करणे म्हणजे लोकशाही मूल्यांवरच आघात असल्याचे त्यांनी नमूद केले.
खासदारांच्या कथित वक्तव्यामुळे केवळ पत्रकारांचाच नव्हे, तर संपूर्ण समाजाचा अपमान झाला असून, अशा प्रवृत्तीला वेळीच आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
निवेदन सादर करताना माजी सभापती अभिमन्यू दहीतुल्य, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सचिव ॲड. उमेश खंदारे, प्रियंका सगट, राहुल शिंपले, स्वाती शिंदे, आशा भोसले, ॲड. प्रियंका ढगे, प्रज्ञा जगताप तसेच महिला काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रकरणात पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते आणि पुढील कायदेशीर कारवाई काय होते, याकडे पत्रकारांसह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.
