पिंपरी, दि. २६ जून : भोसरी गावचे सुपुत्र तसेच महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ समाजसेवक पै. काळुराम लांडगे यांची विशेष कार्यकारी अधिकारी (Special Executive Officer) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार तथा गृहशाखेच्या जनमाहिती अधिकारी अर्पणा देशपांडे आणि वरिष्ठ लिपिक अनिल पाटील उपस्थित होते.
पै. काळुराम लांडगे यांनी तब्बल ३८ वर्षे पीएमपीएमएलमध्ये प्रामाणिकपणे सेवा बजावली. वाहक म्हणून सेवेला सुरुवात करून त्यांनी कंट्रोलर-कम-चेकर या पदापर्यंत मजल मारली. सेवाकाळात प्रवाशांच्या हरवलेल्या बॅगा, मोबाईल, रोकड व इतर मौल्यवान वस्तू त्यांच्या मालकांपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचविण्याचे अनेक उल्लेखनीय कार्य त्यांनी केले.
भोसरी बसस्थानकात कार्यरत असताना प्रवाशांची शिस्तबद्ध व्यवस्था, गर्भवती महिला व ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने बसमध्ये प्रवेश, तसेच पाकिटमार आणि रोडरोमिओंवर करडी नजर ठेवून त्यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळे कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये त्यांचा मोठा आदर आणि दरारा निर्माण झाला होता. कोरोना काळातही त्यांनी अखंडित सेवा बजावत कर्तव्यनिष्ठेचा आदर्श ठेवला.
त्यांच्या उत्कृष्ट सेवाकार्याची दखल घेत सन २०१९ चा महाराष्ट्र शासनाचा ‘गुणवंत कामगार पुरस्कार’ तत्कालीन कामगार मंत्री हसन मुश्रीफ आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला.
धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, साहित्य, पर्यावरण, पत्रकारिता, उद्योग, आरोग्य, कृषी आणि राजकीय अशा विविध क्षेत्रांतही पै. लांडगे यांनी उल्लेखनीय कार्य केले असून, त्यांना आतापर्यंत १०० हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
“जीवनाचा खरा अर्थ संपत्ती जमवण्यात नसून माणुसकी, प्रेम, सत्कर्म आणि जपलेली नाती यात आहे. शेवटच्या प्रवासात सोबत येते ती आपल्या कृतीची पुण्याई आणि लोकांच्या मनात जपलेल्या आठवणी,” असा जीवनमूल्यांचा संदेश पै. काळुराम लांडगे सातत्याने देत असतात.
विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल विविध सामाजिक, शासकीय, कामगार संघटना तसेच गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण, अधिकारी, पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
