उपक्रमातून १ लाख ९ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना वाहतूक व सायबर सुरक्षेचे धडे
पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेच्या २९व्या टप्प्यात १४ शाळांतील २,६७० विद्यार्थ्यांचे प्रबोधन
पिंपरी, दि. २५ जून : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेकडून राबविण्यात येणाऱ्या ‘एक दिवस शाळेसाठी’ या विद्यार्थीभिमुख जनजागृती उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, गुरुवारी (दि. २५) पार पडलेल्या २९व्या टप्प्यात शहरातील १४ शाळांमधील सुमारे २,६७० विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा व विविध सामाजिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या गुरुवारी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत वाहतूक शाखेच्या १४ पथकांमार्फत निवडलेल्या शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांना पॉवर पॉइंट सादरीकरणाच्या माध्यमातून रस्ते सुरक्षा, वाहतूक नियमांचे पालन, अपघात प्रतिबंध, अंमली पदार्थ व व्यसनाधीनतेपासून दूर राहण्याचे महत्त्व, सायबर गुन्हेगारी, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत २९ टप्प्यांत एकूण ४७४ शाळांमध्ये जाऊन तब्बल १ लाख ९ हजार ६०६ विद्यार्थ्यांपर्यंत जनजागृती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण होऊन ते जबाबदार नागरिक व सुजाण व्यक्तिमत्त्व म्हणून घडावेत, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले.
हा उपक्रम पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर आणि अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपआयुक्त (वाहतूक) विक्रांत देशमुख यांच्या नेतृत्वात वाहतूक शाखेतील अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीरीत्या राबविला.
या विद्यार्थीहिताच्या उपक्रमाचा पुढील टप्पा गुरुवार, दि. २ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त विक्रांत देशमुख यांनी दिली.
