खा. संजय दिना पाटील यांचा राजीनामा घ्यावा; पत्रकारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पिंपरी चिंचवड— शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविषयी केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवडमधील पत्रकारांनी बुधवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात तीव्र आंदोलन केले. लोकप्रतिनिधीला अशा प्रकारची शिवराळ भाषा शोभणारी नसल्याचे सांगत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय दिना पाटील यांचा खासदारकीचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी यावेळी पत्रकारांनी केली.
आंदोलनादरम्यान पत्रकारांनी संजय दिना पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदविला. या वेळी ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर म्हणाले, “माध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे आहे. सत्तेच्या मुजोरीतून पत्रकारितेला दबावाखाली आणण्याचा प्रयत्न पत्रकार कधीही सहन करणार नाहीत.”
पत्रकार गोविंद वाकडे यांनी अशा प्रकारची वाचाळ आणि अवमानकारक भाषा वापरणाऱ्या लोकप्रतिनिधीची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. तर पत्रकार संतोष मिश्रा यांनी, “जीवावर बेतले तरी नेत्यांना प्रश्न विचारण्याचे आमचे कर्तव्य आम्ही बजावत राहू. अशा धमक्या आणि दबावाला आम्ही भीक घालणार नाही,” असा ठाम निर्धार व्यक्त केला.
याशिवाय अविनाश चिलेकर आणि बाळासाहेब ढसाळ यांनीही सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर कडक शब्दांत टीका करत पत्रकारांविरोधातील आक्रमक भाषेचा निषेध केला.
या निषेध आंदोलनात गोविंद वाकडे, नंदकुमार सातुर्डेकर, अविनाश चिलेकर, संतोष मिश्रा, रोहित आठवले, बाळासाहेब ढसाळ, विजय जगताप, अनिल वडघुले यांच्यासह मिलिंद कांबळे, अमोल काकडे, नरेश नातू, सुरज कसबे, राजेश स्टीफन, अतुल मारवाडी, प्रसन्न तरडे, विकास शिंदे, भानुदास हिवराळे, विश्वजीत पोल्ले, पराग कुंकूलोळ आदी पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
