पिंपरी-चिंचवड : राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मा. यशवंतभाऊ भोसले यांचा राज्यव्यापी कर्मचारी व कामगार संपर्क दौरा शनिवार (दि. २७ जून) ते सोमवार (दि. २९ जून २०२६) या कालावधीत दौंड, कुरकुंभ एमआयडीसी, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यात विविध औद्योगिक क्षेत्रांतील कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, कामगार, संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत.
शनिवार (दि. २७ जून) रोजी सकाळी ११.३० वाजता पिंपरी-चिंचवड येथून दौऱ्याला प्रारंभ होणार आहे. दुपारी २.३० वाजता दौंड-कुरकुंभ एमआयडीसी येथे कामगार व व्यवस्थापन प्रतिनिधींची संयुक्त बैठक होईल. त्यानंतर कर्मचारी व कामगार संपर्क मेळावा तसेच कर्मचाऱ्यांशी संवाद आयोजित करण्यात आला असून सायंकाळी पंढरपूरकडे प्रस्थान करून तेथे मुक्काम करण्यात येणार आहे.
रविवारी (दि. २८ जून) सकाळी १० वाजता सोलापूर येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सभागृहात राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या कार्यकारिणीची बैठक आणि कर्मचारी मेळावा होईल. त्यानंतर तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन देवस्थानातील कर्मचारी व अधिकाऱ्यांसमवेत कर्मचारी प्रश्नांवर बैठक आयोजित करण्यात आली आहे. पुढे टाटा इन्स्टिट्यूट, तुळजापूर येथील कर्मचारी समितीसोबत चर्चा होणार असून सायंकाळी लातूर येथे कर्मचारी कार्यकारिणी समितीची बैठक पार पडेल. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरकडे प्रस्थान होईल.
सोमवारी (दि. २९ जून) सकाळी छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात संघटनेच्या विधीतज्ज्ञ व अधिवक्त्यांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. दुपारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असून सायंकाळी सिडको येथील ललित कला भवन येथे राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या सभासदांचा भव्य कर्मचारी मेळावा होणार आहे. त्यानंतर रात्री पुण्याकडे प्रस्थान करण्यात येणार आहे.
या राज्यव्यापी संपर्क दौऱ्यात विविध औद्योगिक क्षेत्रांतील कायम व कंत्राटी कर्मचारी, कामगार आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर कायदेशीर मार्गदर्शन, न्यायालयीन बाबी, संघटनेची पुढील भूमिका तसेच कर्मचारी हिताच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. या दौऱ्यामुळे राज्यातील विविध भागांतील कर्मचारी व कामगारांना आपल्या समस्या संघटनेसमोर प्रभावीपणे मांडण्याची आणि त्यावर योग्य मार्गदर्शन मिळविण्याची महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने देण्यात आली आहे.
