वाल्हे, दि.२५ जून (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यातील कामठवाडी (वाल्हे) येथे श्री कानिफनाथ, श्री महादेव आणि श्री खंडोबा मंदिरांचा भव्य प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा बुधवारी (दि. २४) रिमझिम पावसाच्या साक्षीने आणि अत्यंत भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सोहळ्याची सुरुवात सकाळी श्रींच्या मिरवणुकीने झाली. ग्रामस्थांनी घरोघरी गुढ्या उभारून, रांगोळ्या काढून आणि फुलांची सजावट करून मिरवणुकीचे उत्स्फूर्त स्वागत केले. परिसरात सर्वत्र धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. या प्रसंगी होम-हवन, वास्तुपूजन, मूर्ती प्रतिष्ठापना, कलश पूजन, कलशारोहण तसेच महाप्रसाद अशा विविध धार्मिक विधी पार पडले.
या सोहळ्यातील प्रमुख विधी दत्त संस्थान,मढी येथील ह.भ.प. कालिदास महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले. तर पौरोहित्याची जबाबदारी सचिन, अभय आणि समीर देशपांडे यांनी पार पाडली.यावेळी नाथ संप्रदायातील नाथभक्त श्रीधर जगताप उपस्थित होते.
कामठवाडी येथील जुने मंदिर पुणे–पंढरपूर पालखी महामार्गाच्या विस्तारीकरणादरम्यान बाधित झाले होते. त्यानंतर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून आणि सामूहिक सहभागातून पालखी मार्गालगत नव्याने मंदिर उभारले. या नव्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळ्यामुळे गावात विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
या धार्मिक सोहळ्यास पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या डॉ. प्राजक्ता दुर्गाडे, यांच्यासह परिसरातील भाविक, ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक विधीनंतर उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.या शुभप्रसंगी मंदिरासाठी भूदान, श्रमदान व आर्थिक सहाय्य करणाऱ्या दानवीरांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
समस्त कामठवाडी ग्रामस्थांनी या सोहळ्याचे नियोजन,आयोजन आणि व्यवस्थापन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केले.ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे हा धार्मिक सोहळा उत्साहपूर्ण आणि संस्मरणीय ठरला.
