पिंपरी, दि. २३ जून २०२६ – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या ३४१ व्या आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळ्यासह श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या १९५ व्या आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठका पार पडल्या. पालखी मार्ग, मंदिर परिसर, वाहतूक व्यवस्थापन, गर्दी नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्था या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा दि. ७ जुलै २०२६ रोजी, तर श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा दि. ८ जुलै २०२६ रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर पालखी सोहळा शांततेत, सुरक्षिततेत आणि सुरळीतपणे पार पडावा, यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजक, विश्वस्त आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या स्वतंत्र बैठका घेण्यात आल्या.
दि. १८ जून २०२६ रोजी झालेल्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बैठकीस मंदिर संस्थानाचे अध्यक्ष जालिंदर विश्वनाथ मोरे महाराज, पालखी सोहळा प्रमुख विक्रमसिंह उमराज मोरे, लक्ष्मण दत्तात्रय मोरे, उमेश सुरेश मोरे, विश्वस्त दिलीप नारायण मोरे, गणेश उत्तम मोरे आणि वैभव आशोक मोरे उपस्थित होते.
तर दि. २३ जून २०२६ रोजी झालेल्या श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा बैठकीस मंदिर संस्थानाचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे, पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र बाबुराव उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथ गुरु शांतिनाथ, चैतन्य केशवराव लोंढे (कबीरबुवा), अॅड. रोहिणी पवार, पुरुषोत्तम मुरलीधर पाटील, ज्ञानेश्वर वीर तसेच दिंडी मालक राजेंद्र बाळासाहेब पवार (अफळाकर) उपस्थित होते.
बैठकीत पालखी प्रस्थान सोहळा, मंदिर परिसर आणि पालखी मार्गावर उद्भवणाऱ्या अडचणी तसेच त्यावरील उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. विशेषतः वाहतूक नियोजन, पर्यायी मार्ग, दिंडींची वाहने, वारकऱ्यांना मार्गदर्शन, गर्दी नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्थेवर भर देण्यात आला. पालखी मार्गावर कोणतीही अनुचित घटना घडू नये, तसेच वारकऱ्यांना सुरक्षित आणि भक्तीमय वातावरणात संपूर्ण सोहळ्याचा अनुभव मिळावा, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिल्या.
यावेळी विश्वस्तांनी मांडलेल्या सूचनांची नोंद घेऊन पूर्वतयारीच्या दृष्टीने अधिनस्त पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले. बैठकीच्या शेवटी पोलीस आयुक्तांच्या हस्ते उपस्थित विश्वस्तांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.
या दोन्ही बैठकींना पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड (गुन्हे), बसवराज तेली (प्रादेशिक विभाग), पोलीस उपआयुक्त श्वेता खेडकर (परिमंडळ ४), संदीप आटोळे (परिमंडळ १), रोहीदास पवार (गुन्हे शाखा), मारुती जगताप (परिमंडळ ३), धीरज पाटील (विशेष शाखा) आणि विक्रांत देशमुख (वाहतूक शाखा) हेही उपस्थित होते
