पिंपरी चिंचवड दिं. २३ जून ….महाराष्ट्र ही संतांची पावन भूमी असून वारकरी संप्रदायासाठी आळंदी, देहू तसेच तळेगाव-चिखली परिसर अत्यंत श्रद्धास्थान मानला जातो. संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी, कर्मभूमी आणि निर्वाणभूमी म्हणून या परिसराला विशेष धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर आळंदी देवस्थानचे माजी मुख्य विश्वस्त अभय टिळक यांनी देहू ते आळंदी या १६ किलोमीटरच्या पालखी मार्गाला ‘संतभूमी’ घोषित करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत अभय टिळक बोलत होते. यावेळी हभप राजू महाराज ढोरे, डॉ. स्वाती मुले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
अभय टिळक म्हणाले की, उत्तराखंड सरकारने ज्या पद्धतीने काही भागांना ‘देवभूमी’ म्हणून घोषित करून त्या भागांचे पावित्र्य जपत विकासकामे केली, त्याच धर्तीवर देहू-आळंदी पालखी मार्गालाही ‘संतभूमी’ घोषित करावे. या संपूर्ण पट्ट्याच्या विकासासाठी, सार्वजनिक स्वच्छतेसाठी आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी राज्य सरकारने विशेष निधी उपलब्ध करून द्यावा. यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांशी आवश्यक चर्चा व पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
हभप राजू महाराज ढोरे यांनी सांगितले की, या १६ किलोमीटरच्या पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूंना किमान १०० मीटरपर्यंतचा परिसर स्वच्छ, सुस्थितीत आणि पवित्रतेला साजेसा राखला गेला पाहिजे. पालखी मार्गाचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता त्याच्या परिसराचे नियोजनबद्ध संवर्धन होणे आवश्यक आहे.
डॉ. स्वाती मुले यांनी सांगितले की, गेल्या १५ वर्षांत वाढत्या शहरीकरणामुळे या परिसराचे स्वरूप झपाट्याने बदलले आहे. येथे संतपीठ हायस्कूलसह अनेक शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. मात्र, पवित्र इंद्रायणी नदीच्या काठावरील अनेक ठिकाणी दूषित पाणी आणि सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, त्या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारून इंद्रायणी नदीचे पावित्र्य आणि पर्यावरणीय समतोल जपला जावा, अशी मागणीही त्यांनी राज्य सरकारकडे केली.
येत्या महिन्यात होणाऱ्या पंढरपूर वारीपूर्वी या मागणीसंदर्भात राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, पालकमंत्री, महाराष्ट्र विधान परिषद व विधानसभा सदस्य, लोकसभा-राज्यसभा सदस्य, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांचे प्रतिनिधी तसेच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच ‘संतभूमी’ घोषणेच्या मागणीसाठी वारकरी आणि नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात येणार आहे.
हभप राजू महाराज ढोरे यांनी सांगितले की, हा विषय केवळ धार्मिक श्रद्धेपुरता मर्यादित नसून महाराष्ट्राच्या संतपरंपरेचे जतन, सांस्कृतिक वारशाचे संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाशीही निगडित आहे.
