प्रभाग क्र. ११ मध्ये पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज व स्ट्रॉम वॉटर लाईन कामांना गती
पिंपरी-चिंचवड, दि. २२ जून २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात जलसाचणे, ड्रेनेज तुंबणे आणि अस्वच्छतेच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. या गंभीर समस्यांची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक कार्यकर्ते मारुती जाधव यांनी नागरिकांच्या वतीने फ क्षेत्रीय कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा करत निवेदनाद्वारे ठोस मागणी केली होती. त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळत असून प्रशासनाने आता प्रभागातील स्ट्रॉम वॉटर लाईन, नाले आणि ड्रेनेज लाईनची साफसफाई व दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत.
प्रभागातील भीमशक्ती नगर, कृष्णानगर, महात्मा फुले नगर, घरकुल, कोयना नगर, शरद नगर तसेच परिसरातील विविध भागांमध्ये पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजना वेगाने सुरू करण्यात आल्या आहेत. या कामांमुळे पावसाचे पाणी साचणे, रस्त्यांवर सांडपाणी येणे, दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. विशेषतः घरकुल आणि भीमशक्ती नगर परिसरातील नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळणार असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
याबाबत मारुती जाधव म्हणाले, “नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करणे हे आमचे कर्तव्य आहे. प्रशासनाने आमच्या मागणीची दखल घेऊन कामांना सुरुवात केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. उर्वरित कामेही तातडीने पूर्ण करून नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा द्यावा.”
प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांच्या वतीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन, फ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आणि संबंधित विभागांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत. नागरिकांच्या हितासाठी अशीच सकारात्मक, तत्पर आणि परिणामकारक कार्यवाही पुढेही सुरू राहील, अशी अपेक्षा मारुती जाधव यांनी व्यक्त केली.
