पिंपरी/दिघी, दि.२२ जून : रुम सोडून गेल्याच्या कारणावरून मनात राग धरत मेव्हणे आणि मेव्हणीने एका व्यक्तीवर भररस्त्यात हल्ला केल्याची धक्कादायक घटना दिघी परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
दिघी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, प्रकाश महादेव राठोड (वय ३४, रा. मॉउंटन ड्यू अपार्टमेंट, समर्थ नगर, दिघी) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार १९ जून २०२६ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ताजणे मळा, चऱ्होली, ता. हवेली, जि. पुणे येथील सार्वजनिक रस्त्यावर घडला. याप्रकरणी अक्षय नामदेव चव्हाण (वय २०), अनुराग नामदेव चव्हाण (वय २२) आणि रेणुका नामदेव चव्हाण (वय २३) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने संबंधितांची रुम सोडून गेल्याचा राग आरोपींनी मनात धरला होता. त्यातून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपी अक्षय चव्हाण याने फिर्यादीला हाताने मारहाण केली आणि नंतर कुठूनतरी लाकडी बांबू आणून फिर्यादीच्या पाठीवर व मानेवर सपासप प्रहार केले. भांडण सोडवण्यासाठी धावून आलेल्या फिर्यादीच्या भाच्यालाही बांबूने मारहाण करण्यात आली.
यावेळी आरोपी रेणुका चव्हाण हिनेही शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तर अनुराग चव्हाण याने फिर्यादीला ढकलून खाली पाडले आणि रस्त्यावर पडलेला दगड डोक्यात मारून जखमी केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. हल्ल्यानंतर “तुला सोडणार नाही, पुण्यात राहू देणार नाही,” अशी धमकीही आरोपींनी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९१/२०२६ नोंदविण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३५२, २५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंगारे करत आहेत.
