आळंदी, दि.२२ जून – बांधकामाच्या ठिकाणी माती टाकण्याच्या कारणावरून झालेला किरकोळ वाद थेट हिंसक हल्ल्यात परिवर्तित झाल्याची धक्कादायक घटना आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणात एका दाम्पत्यावर लाकडी फळीने बेदम मारहाण करण्यात आल्याची तक्रार दाखल झाली असून, आळंदी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३४/२०२६ अंतर्गत बीएनएस कलम ११८(१), ३५२, ३५१(२), २९६ तसेच भादवि कलम ३२४, ५०६, २९४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संध्या अनिरुद्ध यादव (वय ३९, रा. दक्षिण लक्ष्मीनगर, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये विकास आत्माराम चौधरी (वय ३४) आणि सोनाली विकास चौधरी (वय ३१, दोघे रा. हरीप्रसाद पार्क, गट नं. २५२, बर्गेवस्ती, चिंबळी, ता. खेड, जि. पुणे) यांचा समावेश आहे. अद्याप दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
फिर्यादी संध्या यादव या बांधकाम सुरू असलेल्या साईटवर असताना आरोपी विकास चौधरी तेथे आला. साईटवरील वाळू-मातीच्या ढिगाऱ्याबाबत त्याने वाद घालत “मला रोडवर माती टाकायची आहे” असे सांगितले. त्यावर फिर्यादींनी “जागा भरपूर आहे, तुम्ही माती टाकू शकता” असे सांगितल्याने आरोपी संतापला. त्याने फिर्यादींना अश्लील शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली.
यानंतर दुसऱ्या दिवशी फिर्यादी आणि त्यांचे पती अनिरुद्ध ब्रीजेश्वर यादव हे बांधकामस्थळी असताना पुन्हा आरोपी तेथे आला. दोघांमध्ये बांधकामासंदर्भात चर्चा सुरू असतानाच आरोपी विकास चौधरी अचानक संतापून पळत-पळत फिर्यादी आणि त्यांच्या पतीच्या अंगावर धावून आला. त्याने तेथे पडलेली लाकडी फळी उचलून दोघांवर हल्ला चढवला.
या हल्ल्यात आरोपीने फिर्यादी संध्या यादव यांच्या कपाळावर लाकडी फळीने जोरदार प्रहार केला. तसेच त्यांच्या पती अनिरुद्ध यादव यांच्या डोक्यावर, पाठीवर मारहाण केली, हात पिरगळला, तसेच हातानेही मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. हल्ल्यादरम्यान आरोपी मोठमोठ्याने अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या देत होता. इतकेच नव्हे, तर आरोपीची पत्नी सोनाली चौधरी हिनेही फिर्यादी दाम्पत्याला हाताने मारहाण करून शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणाचा तपास आळंदी पोलीस करत असून, संबंधित आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, बांधकामाच्या वादातून थेट हल्ल्यापर्यंत प्रकरण पोहोचल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
