आकुर्डीतून सायबर गुन्हा दाखल; अज्ञाताविरुद्ध पिंपरी पोलिसांत गुन्हा
पिंपरी, दि.२१ जून –“२५ स्टार हॉटेल्सना रेटिंग दिल्यास आर्थिक फायदा मिळेल” असे आमिष दाखवून एका महिलेची तब्बल २ लाख ८७ हजार ६८१ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. २० मे २०२६ रोजी सकाळी ९ ते रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान चरमेक्स कंपनी, आकुर्डी, पुणे येथे घडली. याप्रकरणी पीडित महिलेने दि. २० जून २०२६ रोजी रात्री ९.०३ वाजता पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीने फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन करून तिला “२५ स्टार हॉटेल्सना ऑनलाईन रेटिंग देण्याच्या टास्कमध्ये सहभागी झाल्यास आर्थिक फायदा मिळेल” असे सांगितले. त्यानंतर विविध यूपीआय आयडींवर पैसे पाठविण्यास सांगून टप्प्याटप्प्याने तिच्याकडून २,८७,६८१ रुपये उकळले. फसवणुकीची जाणीव झाल्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली.
या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७६/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम ३१८(१), ३१८(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(क), ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.
