‘मेरी आवाज सुनो’ कार्यक्रमात मुकेश यांच्या अजरामर गीतांनी रंगली मैफल
पुणे (किवळे), दि.२२ जून २०२६ : जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधत किवळे विकासनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात ज्येष्ठांसाठी खास आयोजित करण्यात आलेल्या ‘मेरी आवाज सुनो’ या सांगीतिक कार्यक्रमाने रविवारी वातावरण सुरेल केले. ज्येष्ठ नागरिक संघ आणि श्री चैतन्य क्रिएशन निर्मित या कार्यक्रमाचे आयोजन निर्माते व संकल्पनाकार एम. डी. चौधरी आणि रवि कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या विशेष कार्यक्रमात हिंदी चित्रपटसृष्टीतील अमर गायक स्वर्गीय मुकेश यांच्या गाण्यांची बहारदार मैफल रंगली. डम डम डिगा डिगा, मेरा नाम राजू, चल अकेला, हमने तुझको प्यार किया है, जीना इसी का नाम है, सावन का महीना, कभी कभी मेरे दिल में खयाल आता है, सब कुछ सीखा हमने, दुनिया बनाने वाले, महबूब मेरे, एक दिन बिक जाएगा, जिस गली में तेरा घर ना हो, जुबां पे दर्द भरी दास्तां, दिवानों से ये मत पूछो यांसारखी अनेक अजरामर गीते सादर करण्यात आली. या गीतांनी उपस्थित ज्येष्ठांना जुन्या आठवणींमध्ये रमवले.
कार्यक्रमात विश्वास आंबेकर, गोपीनाथ कुलकर्णी, मकरंद छापेकर, राम खापरे, विजय उपासनी, बसवराज धोत्रे, गफूरभाई शेख, अलका हुके, वनिता नाफडे, निखिल, आर्या, प्रतिभा भाले, सुरेश गायकवाड, दशरथ वाघमारे, माटेश्वरी मॅडम, ब्रह्मे मॅडम, बापू देवरे आणि अजय आमटे यांनी गाण्यांच्या माध्यमातून उपस्थितांचे भरभरून मनोरंजन केले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नानासाहेब डोईफोडे, सचिव पंढरीनाथ सानप यांच्यासह संघाचे सर्व संचालक, सभासद आणि संगीतप्रेमी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधत ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंद, आठवणी आणि संगीताचा सुरेल संगम अनुभवायला मिळाला.
