पुणे, प्रतिनिधी : पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने धाड टाकून परदेशी महिलेसह तीन तरुणींची सुटका केली. या प्रकरणी तरुणींचा पुरवठा करणाऱ्या दोन एजंटांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘विरु’ व ‘ध्रुव’ या नावाने ओळखले जाणारे एजंट पुण्यातील विविध हॉटेलमध्ये देशी व परदेशी तरुणींना ठेवून ग्राहकांशी संपर्क साधत होते. ग्राहकांना तरुणींचे फोटो पाठवून व्यवहार निश्चित केला जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाला मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचला. संबंधित एजंटाने १२ हजार रुपयांत तरुणी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवून शिवाजीनगर येथील एका हॉटेलमध्ये बोलावले. बनावट ग्राहकाने ठरलेल्या ठिकाणी पोहोचून पोलिसांना संकेत दिल्यानंतर पथकाने तात्काळ छापा टाकला.
या कारवाईत नवी दिल्ली येथील एका तरुणीची सुटका करण्यात आली. तिच्याकडून चौकशी केल्यानंतर आणखी दोन तरुणी सेनापती बापट रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी तेथेही धाड टाकून दिल्ली व तुर्कमेनिस्तान येथील दोन तरुणींची सुटका केली.
या प्रकरणी दोन्ही एजंटांविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक आणि वेश्याव्यवसाय प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार आंधळे, भिवरकर, रसाळ, अविनाश कोंडे, जाधव तसेच महिला पोलीस अंमलदार खेडेकर, वैशाली इंगळे आणि रेश्मा इंगळे यांच्या पथकाने केली.