सेवा करा… पण शिस्त, संयम आणि सुयोग्य नियोजनासह!
“हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा.”
संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाप्रमाणे भक्ती, सेवा आणि समर्पण हाच वारीचा खरा संदेश आहे. दरवर्षी संत तुकाराम महाराजांची पवित्र पालखी पिंपरी-चिंचवड शहरातून पंढरपूरकडे प्रस्थान करते. लाखो वारकरी मुखी “विठ्ठल… विठ्ठल…” नाम घेत भक्तिभावाने चालत असतात.
या काळात अनेक नागरिक वारकऱ्यांना पिण्याचे पाणी, फळे, अल्पोपहार आणि इतर साहित्य वाटप करून सेवा करण्याचा प्रयत्न करतात. ही सेवा निश्चितच पुण्यकारक आहे; मात्र ती सुरक्षित, शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक होणे तितकेच आवश्यक आहे.
संत तुकाराम महाराज म्हणतात ……
“जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले ।
तोचि साधु ओळखावा, देव तेथेंच जाणावा ॥”
सेवा ही दिखाव्यासाठी नव्हे, तर समाजहितासाठी असावी. रस्त्यावर अचानक साहित्य वाटप केल्याने गर्दी वाढते. त्यामुळे चेंगराचेंगरी, पाकीटमारी, मंगळसूत्र चोरी, लहान मुलांचा गोंधळ तसेच अपघात होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
वारकरी संप्रदायाचे वैशिष्ट्य म्हणजे साधेपणा, संयम आणि निस्पृहता. संत तुकाराम महाराज म्हणतात ….
“वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ।पक्षीही सुस्वरे आळविती ॥”
इतिहास साक्षी आहे की, दिंडी व्यवस्थेतील शिस्त, सामूहिक नियोजन आणि परस्पर सहकार्यामुळे लाखो वारकरी असूनही वारी शांततेत व सुरळीत पार पडते. ही परंपरा संपूर्ण जगासाठी अनुकरणीय आहे.
त्यामुळे सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की, रस्त्यावर गर्दी करून वाटप करण्याऐवजी पालखीच्या मुक्कामस्थळी, दिंडी प्रमुखांच्या समन्वयाने किंवा प्रशासनाने निश्चित केलेल्या सेवा केंद्रांवर अन्न, पाणी, फळे किंवा इतर साहित्य द्यावे. त्यामुळे सेवा योग्य वारकऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि वाहतूक व सुरक्षेचे प्रश्नही निर्माण होणार नाहीत.
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना….
• रस्त्यावर गर्दी करून खाऊ किंवा वस्तू वाटप करू नये.
• सेवा साहित्य मुक्कामस्थळी किंवा अधिकृत सेवा केंद्रांवरच द्यावे.
• लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी.
• वाहनचालकांनी संयम बाळगून वाहतूक नियमांचे पालन करावे.
• मौल्यवान वस्तू, दागिने आणि रोख रक्कम सुरक्षित ठेवावी.
• संशयास्पद व्यक्ती किंवा घटना आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.
• पालखी व वारकऱ्यांच्या दर्शनासाठी अनावश्यक गर्दी टाळावी आणि त्यांच्या प्रवासात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
संत तुकाराम महाराज म्हणतात …..
“तुका म्हणे धावा विठोबासी ।आणिक नको काही ॥”वारकरी संप्रदाय आपल्याला संयम, शिस्त, समता आणि सेवाभाव शिकवतो. त्यामुळे सेवा करताना सुरक्षितता, शिस्त आणि व्यवस्थेचे भान राखणे हीच खरी विठ्ठल सेवा ठरेल.
“हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा.”
सर्व पिंपरी-चिंचवडकरांना नम्र आवाहन…..
भक्तिभाव जपूया… शिस्त पाळूया… आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुरक्षित, सुव्यवस्थित, शांततापूर्ण व मंगलमय करूया.
