आरोपीला संभाजीनगरातून अटक
पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : दिघी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अवघ्या १२ तासांत खुनाच्या गंभीर गुन्ह्याचा छडा लावत आरोपीला ताब्यात घेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
याप्रकरणी फिर्यादी राजेंद्र लालासाहेब गिलबिले यांनी १६ जून २०२६ रोजी तक्रार दिली होती. त्यानुसार, काळजेवाडी, चऱ्होली बुद्रुक (ता. हवेली) येथे राहणाऱ्या त्यांची चुलती शंकुतला काळुराम गिलबिले (वय ७५) या घरी एकट्या असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यावर धारदार हत्याराने गंभीर वार करून त्यांचा खून केला होता. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८२/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दिघी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मयताच्या नातेवाईकांची व परिसरातील नागरिकांची चौकशी करून माहिती संकलित केली. तसेच परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी व मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले.
तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्यानंतर पथकाने तातडीने संभाजीनगर येथे जाऊन संशयित भगवान दगडुजी पाटील (वय ४८, व्यवसाय शेती, मूळ रा. भवानीनगर, कायगाव रोड, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर, सध्या रा. काळजेवाडी, चऱ्होली, पुणे) याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. आरोपी हा मयताच्या शेतात मजूर म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपायुक्त मारुती जगताप आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस निरीक्षक विनायक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास कामुनी, पोलीस उपनिरीक्षक आबा कटपाळे तसेच नितीन तारडे, राम बहिरट, राहुल लोणकर, प्रमोद गाडे, नितीन लवटे, राहुल वाघमारे, सुधीर डोळस, सोमा खळसोडे आणि दत्ता मुंढे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.