पिंपरी, दि. १८ जून २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील कथित भ्रष्टाचार, बेकायदेशीर कामे आणि विविध विभागांतील अनियमिततेविरोधात जनजागृती करण्यासाठी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर शाखेच्या वतीने गुरुवारी सकाळी ‘जागर मोर्चा’ काढण्यात आला.
शहरप्रमुख चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेला हा मोर्चा सकाळी १० वाजता चिंचवड स्टेशन परिसरातील हनुमान मंदिर, एम्पायर सोसायटी येथून सुरू झाला. त्यानंतर मोर्चा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचला.
यावेळी चेतन पवार यांनी सांगितले की, शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत अनेकदा आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला. मात्र प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने शिवसेनेने रस्त्यावर उतरून जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे.
मोर्चामध्ये शिक्षण मंडळ, भूमी व जिंदगी विभाग, वैद्यकीय विभाग, बांधकाम विभाग, स्थापत्य विभाग, क्रीडा विभाग, आरोग्य तसेच पर्यावरण विभागातील कथित भ्रष्टाचार आणि गैरकारभाराच्या मुद्द्यांवर आवाज उठविण्यात आला. आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.
राज्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील घडामोडी आणि पक्षफुटीच्या चर्चांना उधाण आले असतानाच, पिंपरी-चिंचवडमध्ये शहराध्यक्ष चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेला हा आक्रमक ‘जागर मोर्चा’ स्थानिक राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे.
