पिंपरी चिंचवड: रावेत परिसरातील एका स्पा सेंटर चालकाला धमकावून खंडणी उकळल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१५/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८(२), ३०८(३), २२९(४), २५१(२) आणि ३(५) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
फिर्यादी दिपक ज्योतीराम कोल्हापुरकर (वय ३८, रा. म्हाळुंगे, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. २३ मे २०२६ ते १६ जून २०२६ या कालावधीत रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास वाकोनवा स्पा, मस्के वस्ती, रावेत येथे ही घटना घडली.
या प्रकरणी व्वाली गायकवाड आणि विष्णू सुरवसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या स्पा सेंटरमध्ये परवानगीशिवाय प्रवेश करून तेथील व्हिडिओ चित्रित केले. त्यानंतर ते व्हिडिओ फिर्यादीला पाठवून, “स्पा चालवायचा असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील, अन्यथा हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू,” अशी धमकी दिली. आरोपींनी एकूण ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यापैकी आरोपींनी रोख स्वरूपात ५ हजार रुपये घेतले असून, उर्वरित ४५ हजार रुपयांसाठी वारंवार फोन करून दबाव टाकल्याचा आरोप आहे. तसेच स्पामध्ये आलेल्या ग्राहक धनाजी लक्ष्मण भोंडवे यांच्याकडेही व्हिडिओ व्हायरल न करण्याच्या मोबदल्यात ५,५०० रुपयांची मागणी करून पैसे घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खिळे करीत आहेत.
