चाकण, दि. १५ जून – तळेगाव चौक, चाकण येथे झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी उत्तर चाकण पोलिस ठाण्यात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १४ जून रोजी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास तळेगाव चौक येथे कंटेनर (क्र. MH 46 BU 0672) चालक शंकर बळीराम जाधव (वय ३८, रा. रांजणगाव, ता. शिरूर, जि. पुणे) याने निष्काळजीपणे वाहन चालवत असताना एका महिलेला डाव्या बाजूने धडक दिली. या अपघातात महिलेच्या पाय व कंबरेवरून कंटेनरचे चाक गेल्याने ती गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाली.
घटनास्थळी उपस्थित असलेले फिर्यादी साईनाथ महादेव माकणे (वय २०, व्यवसाय – रुग्णवाहिका चालक, रा. आंबेठाण रोड, चाकण) व स्थानिक नागरिकांनी जखमी महिलेला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे नातेवाईकांनी तिची ओळख रोहिणी हिरासिंग दुहवेरा (रा. आंबेठाण, ता. खेड, जि. पुणे) अशी पटवून दिली. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दि. १५ जून रोजी पहाटे १.३० वाजता तिला मृत घोषित केले.
या प्रकरणी उत्तर चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५१८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१, १०६(१), १२५(३), १२५(ड) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चालकास बीएनएसएस कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यात आली असून पुढील तपास उत्तर चाकण पोलीस करीत आहेत.