पिंपरी, दि.१७ जून : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागात प्रशासकीय त्रुटी, कर्मचाऱ्यांचा गैरकारभार आणि रुग्णसेवेत गंभीर हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सायली किरण नढे यांनी केला आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्त आणि महापौर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सायली नढे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, रुग्णालयातील टाके घालणे व टाके काढणे यांसारखी तांत्रिक आणि संवेदनशील कामे मानधनावरील कर्मचाऱ्यांकडून करून घेतली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा प्रकारामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
तसेच, रात्रीच्या वेळी कर्तव्यावर असलेले काही डॉक्टर रुग्णांना प्रतीक्षेत ठेवून केबिनमध्ये झोपून राहत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, दुपारी केसपेपर खिडकी बंद झाल्यानंतर काही कायमस्वरूपी कर्मचारी मद्यपान करून झोपतात. तसेच कामाच्या वेळेत बाहेरील व्यक्तींना बोलावून गोंधळ घालणे, गुटखा व तंबाखू सेवन करणे यांसारखे प्रकार नियमितपणे घडत आहेत. अनेक कर्मचारी केवळ उपस्थितीची नोंद करून वैयक्तिक कामांसाठी बाहेर जात असून, त्यांची जबाबदारी कंत्राटी कर्मचाऱ्यांवर टाकली जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास आणि रॅगिंगला सामोरे जावे लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्यामुळे जनतेच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचा आरोप सायली नढे यांनी केला आहे. संबंधित दोषी कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांना तत्काळ निलंबित करावे, तसेच एकाच ठिकाणी अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासोबतच बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली आणि आकस्मिक तपासणीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवावे, अशी सूचनाही प्रशासनाला करण्यात आली आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. उमेश खंदारे, स्वाती शिंदे, प्रियंका सकट, आशा भोसले, ॲड. प्रियंका ढगे आणि प्रज्ञा जगताप उपस्थित होते.
