पिंपरी-चिंचवड : मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत दिघी परिसरात फायरिंग करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तसेच ७० पेक्षा अधिक चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या मुख्य आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
दि. १३ मे २०२६ रोजी दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फायरिंग करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शेखर संभाजी जाधव आणि त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले होते. या प्रकरणाचा तपास करून आरोपींना अटक करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले होते.
तांत्रिक तपासादरम्यान आरोपी शेखर जाधव आणि त्याचा साथीदार मुस्तफा उर्फ भाईजान हे रांजणगाव परिसरात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर आरोपींनी गोळीबार केला आणि उसाच्या शेताचा फायदा घेत पसार झाले होते. या घटनेप्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यातही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मुख्य आरोपीच्या शोधासाठी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांमध्ये अनेक वेळा जाऊन तपास केला. गोपनीय माहितीदारांचे जाळे निर्माण करून तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले.
अखेर मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने १४ जून २०२६ रोजी सायंकाळी मोझे शाळेजवळील मोकळ्या मैदानात सापळा रचून आरोपी शेखर संभाजी जाधव (वय २५, रा. मोघा, ता. उदगीर, जि. लातूर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे ५१ हजार रुपये किंमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी त्याला दिघी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते आणि मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी केली.
