पालकांनी मुलांचे मित्र बनून संवाद वाढवावा : व्ही. एस.काळभोर
खंडोबा देवस्थान ट्रस्ट व पीसीईटीतर्फे ३५० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
पिंपरी, दि. ८ जून २०२६ : विद्यार्थ्यांनी करिअरची निवड करताना स्वतःची आवड, क्षमता आणि कौशल्य यांचा सखोल विचार करावा. निवडलेल्या क्षेत्रात रोजगार व व्यवसायाच्या किती संधी उपलब्ध आहेत, याचाही अभ्यास करणे आवश्यक आहे. पालकांनीदेखील स्वतःच्या अपेक्षा मुलांवर लादण्याऐवजी त्यांच्या आवडी-निवडी समजून घेऊन योग्य मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन पीसीईटी प्लेसमेंट सेलचे प्रमुख डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी केले.
आकुर्डी येथील श्री खंडोबा सांस्कृतिक भवनात खंडोबा देवस्थान ट्रस्ट आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी, अनाथ विद्यार्थी आणि मूकबधिर विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला पीसीईटीचे सचिव व खंडोबा देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष व्ही. एस. काळभोर, ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल रामचंद्र काळभोर, उपमहापौर शर्मिला बाबर, माजी उपमहापौर दिनकरराव दातीर पाटील, कला-क्रीडा विभाग सभापती कैलास कुटे, शंकराव पांढरकर, विजय काळभोर, विजय कोळपकर, विनायक काळभोर, रोहन मुळे तसेच ट्रस्टचे पदाधिकारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावर्षीच्या शैक्षणिक कामगिरीत दहावीतील वेदांत दाभाडे याने ९९ टक्के, अद्विका डागलिया हिने ९७ टक्के, तर बारावीतील गायत्री कुंभार हिने ९६ टक्के गुण मिळवत विशेष यश संपादन केले. या विद्यार्थ्यांना सायकल, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि शालेय साहित्य देऊन गौरविण्यात आले. याशिवाय दहावी-बारावीमध्ये ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या सुमारे ३५० विद्यार्थ्यांचा, तसेच पियुष व आयुष फुले या अनाथ विद्यार्थ्यांसह निगडीतील मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला.
डॉ. रवंदळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींशी संवाद साधावा, त्यांचे मार्गदर्शन घ्यावे आणि सतत नवीन ज्ञान आत्मसात करावे. कॉलेज शिक्षणादरम्यान प्रत्येक सत्रात एखादा प्रकल्प पूर्ण करणे तसेच ऑफलाइन किंवा ऑनलाइन इंटर्नशिप करणे विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी अत्यंत उपयुक्त ठरते.
प्रास्ताविकात अध्यक्ष विठ्ठल रामचंद्र काळभोर यांनी ट्रस्टच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. गेल्या तीन वर्षांपासून पीसीईटीच्या सहकार्याने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येत असून, ट्रस्टने वैद्यकीय शिबिरे, सामूहिक विवाह सोहळे यांसारखे उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. तसेच लवकरच स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पीसीईटीचे सचिव व्ही. एस. काळभोर यांनी पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, वयात आलेल्या मुलांचे मित्र बनणे ही काळाची गरज आहे. पालक आणि मुलांमध्ये सुसंवाद व विश्वासाचे नाते असणे आवश्यक आहे. पीसीईटी संस्था ‘केजी टू पीजी’ शिक्षण देण्यात अग्रेसर असून, तीन हजार विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या संस्थेत आज सुमारे वीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांनी महापालिकेच्या विविध शैक्षणिक योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कैलास कुटे यांनी खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या शतकोत्तर परंपरेचा गौरव करताना धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची प्रशंसा केली.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विठ्ठल रामचंद्र काळभोर यांनी केले. सूत्रसंचालन गणेश काळभोर आणि गणेश दातीर पाटील यांनी केले, तर आभार संतोष तरटे यांनी मानले.
