पिंपळे सौदागर (पुणे) : वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत भरधाव वेगाने दुचाकी चालविल्याने झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची घटना पिंपळे सौदागर परिसरात घडली आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १ जून २०२६ रोजी रात्री ११.३० ते २ जून रोजी पहाटे १२.४० वाजण्याच्या सुमारास पी. के. चौकाजवळील विश्वशांती कॉलनी, बीआरटी बस स्टॉप परिसरात हा अपघात झाला. संकेत प्रभाकरराव गुंजकर (मूळ रा. संभाजीनगर) हे बजाज पल्सर २२० (एमएच १२ एमसी ५७३२) दुचाकीवरून नाशिक फाटा ते कोकणे चौक मार्गे जात होते.
यावेळी त्यांनी वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून दुचाकी भरधाव व निष्काळजीपणे चालविली. त्यामुळे नियंत्रण सुटून दुचाकी पी. के. चौकाजवळील बीआरटी बस स्टॉपच्या भिंतीवर आदळली. या अपघातात संकेत गुंजकर गंभीर जखमी झाले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेत दुचाकीचेही नुकसान झाले असून, सांगवी पोलीस ठाण्यात बीएनएस कलम १०६(१), २८१, ३२४(२) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ व ११९/१७७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सांगवी पोलीस उपनिरीक्षक जावळे करीत आहेत.