जालना पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाची धडक कारवाई
जालना, प्रतिनिधी : जालना शहरात ऑनलाईन पद्धतीने तलवार मागवून ती ताब्यात घेत असताना एका तरुणाला जालना पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATU) रंगेहाथ पकडले. या कारवाईत पोलिसांनी ३ हजार ५०० रुपये किमतीची तलवार जप्त केली असून आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू आणि अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे व त्यांच्या पथकाने माहिती संकलन सुरू ठेवले होते.
दरम्यान, शिवाजी पुतळा परिसरातील पोस्ट ऑफिसमध्ये एका तरुणाने ऑनलाईन पद्धतीने तलवार मागवून ती घेण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून सिद्धेश्वर एकनाथ राठोड (वय २४, रा. म्हाडा कॉलनी, भोकरदन नाका, जालना) याला ताब्यात घेतले.
झडतीदरम्यान आरोपीकडून एक तलवार जप्त करण्यात आली. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पुढील तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, पोलीस उपनिरीक्षक शिवरकर, पोहेकॉ गडधे, पोहेकॉ सोनवणे तसेच दहशतवाद विरोधी पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात जालना पोलिसांची ही कारवाई कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.
