सासवड-लोणंद रोडवरील बेलसर टोल प्लाझा सुरू ;हडपसर-जेजुरी, मोरगाव व निरा मार्गावरील बस प्रवाशांवर परिणाम
पुणे दिं.०३ जून २०२६….सासवड-लोणंद रोडवरील बेलसर (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील टोल प्लाझा २४ एप्रिल २०२६ पासून कार्यान्वित झाला असून, या टोल नाक्यावरून ये-जा करणाऱ्या पीएमपीएमएल बसांनाही पथकर आकारला जात आहे. त्यामुळे संबंधित बसमार्गांवरील प्रवाशांकडून प्रति प्रवासी १ रुपया टोल तिकीट शुल्क आकारण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) घेतला आहे.
पीएमपीएमएलच्या माहितीनुसार, कात्रज, निगडी आणि बालेवाडी डेपोच्या बसेस ज्या टोल नाक्यांवरून प्रवास करतात, त्या ठिकाणीही प्रवाशांकडून प्रति प्रवासी १ रुपया टोल शुल्क आकारले जाते. त्याच धर्तीवर बेलसर टोल प्लाझावरून धावणाऱ्या बस सेवांसाठीही ही आकारणी लागू करण्यात आली आहे.
ही अतिरिक्त आकारणी खालील बसमार्गांवरील प्रवाशांना लागू राहणार आहे :
💮बसमार्ग क्र. २१० – हडपसर ते जेजुरी एमआयडीसी
💮बसमार्ग क्र. २१२ – हडपसर ते मोरगाव
💮बसमार्ग क्र. २१३ – हडपसर ते निरा
या मार्गांवर प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांनी टोल तिकीट आकारणीची नोंद घेऊन परिवहन महामंडळास सहकार्य करावे, असे आवाहन पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक (ऑपरेशन) यांनी केले आहे.
