स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
जालना प्रतिनिधी..…जालना जिल्ह्यातील चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अटक केली आहे. तब्बल चार महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या पीडितेची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंदनझिरा पोलीस ठाणे हद्दीतील खादगाव येथील एका ३९ वर्षीय महिलेने ५ फेब्रुवारी २०२६ रोजी तक्रार दिली होती. त्यांच्या अल्पवयीन मुलीला माळशेंद्रा (ता. जि. जालना) येथील आरोपी दीपक राजू जाधव (वय २५) याने फूस लावून पळवून नेले होते. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, अनेक दिवस तपास करूनही आरोपी आणि पीडिता मिळून येत नव्हते.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्री. तेघबीर सिंह संधू यांनी २१ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांमार्फत शोध सुरू केला. तपासादरम्यान आरोपी आणि पीडिता हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव (वाळूज) परिसरात असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी माउली नगर, कमळापूर (ता. गंगापूर) येथे छापा टाकून आरोपी दीपक जाधव याला ताब्यात घेतले आणि पीडित मुलीची सुटका केली. या दोघांनाही जालना येथे आणून पुढील तपासासाठी चंदनझिरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज जाधव, स.पो.नि सचिन खामगळ, पो.उप.नि राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, प्रशांत लोखंडे, रेणुका बाडे, सौरभ मुळे आणि सायबर सेलचे संदीप माटे यांनी यशस्वी केली.
