पुनावळे (ता. मुळशी) : भरधाव वेगाने व निष्काळजीपणे मालवाहू ट्रक चालवून दुचाकीला धडक दिल्याने एका १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ३१ मे रोजी पहाटे पुनावळे येथील अॅडमव्हिले सोसायटीसमोरील रस्त्यावर घडली. या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कृष्णा पनश्याम शर्मा (वय १८, रा. समर्थ कॉलनी, विजयनगर, काळेवाडी, पुणे) हे त्यांचा मित्र ओमकार शिखरे याच्यासह अॅक्टिव्हा दुचाकीवरून जेएसपीएम कॉलेज परिसरातून हिंजवडीकडे जात होते. त्यावेळी पहाटे साडेतीनच्या सुमारास पुनावळे येथील अॅडमव्हिले सोसायटीसमोरील रस्त्यावर मागून आलेल्या टाटा कंपनीच्या मालवाहू ट्रक (क्रमांक DL 1 LAN 6322) चालकाने भरधाव वेगाने दुचाकीला ओव्हरटेक केले.
ओव्हरटेक केल्यानंतर वाहतुकीचे नियम न पाळता चालकाने अचानक ट्रक वळविल्याने दुचाकी ट्रकला धडकली. या अपघातात कृष्णा शर्मा व ओमकार शिखरे हे रस्त्यावर फेकले गेले. गंभीर दुखापत झालेल्या ओमकार शिखरे यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१, १०६(१) तसेच मोटार वाहन कायद्यांतर्गत कलम १८४, १३४, ११९/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रावेत पोलीस करत आहेत.